गिरीश महाजन कुंभमेळ्याच्या दलालीत मग्न; अंबादास दानवेंचा जळगावातून हल्लाबोल

default logo lokrajya

जळगाव, 25 ऑक्टोबर: राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जळगाव येथे जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कुंभमेळ्याची दलाली खाण्यात महाजन मग्न असून त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखाशी आता काहीही देणेघेणे उरलेले नाही, असा घणाघात दानवे यांनी केला.

सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त असलेले महाजन आता मोठे सरंजामदार आणि भांडवलदार बनल्याची बोचरी टीका दानवे यांनी केली. ते जिल्ह्यात फिरकत देखील नाहीत आणि त्यांचा बहुतांश वेळ केवळ पुणे व मुंबईतच जातो, असे ते म्हणाले. यासोबतच, त्यांच्या नातेवाईकांना बोगस ऑर्डर प्रकरणात पकडण्यात आले असल्याचा दावाही दानवे यांनी यावेळी केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपवरही अंबादास दानवे यांनी भाष्य केले. या ५०० कोटींच्या प्रकरणाचा संबंध भाजपच्या मीडिया इन्चार्जशी असल्याचे त्यांनी सांगितले. हे पैसे कोणी आणि कसे दिले, याची संपूर्ण माहिती संबंधित महिलेला आहे, असे दानवे म्हणाले.

या प्रकरणातील संबंधित महिलेवर तत्काळ गुन्हा दाखल करून तिची सखोल चौकशी व्हावी आणि तिला थेट तुरुंगात टाकावे, अशी मागणी दानवे यांनी केली. तुमच्या-आमच्यासारखा सामान्य माणूस असता तर पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती, मग आता राज्यातील पोलीस झोपले आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. हे ५०० कोटी रुपये कुठून आणले गेले व कोणाला दिले गेले, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Lokrajya

Lokrajya is an English digital news platform covering politics, governance, public policy, current affairs, law, business and issues that matter to people across India. The editorial team focuses on clear, factual and context-driven reporting, with an emphasis on accuracy, credible sources and responsible journalism.

🕘 संबंधित बातम्या