प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ‘पोलिसांचे ८० टक्के काम मीच केले, पण दबावामुळे केवळ सोंग सुरू’, राम पूर्णेकर यांचा गंभीर आरोप

default logo lokrajya

प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आता २७ दिवसांचा कालावधी लोटला आहे, मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना तपासासाठी आवश्यक असलेले सर्व पुरावे आपण दिले असून, त्यांच्या वाट्याचे ८० टक्के काम स्वतःच केल्याचा दावा राम यांनी केला आहे. तसेच, राजकीय नेत्यांच्या दबावामुळे या प्रकरणात न्याय मिळण्यास विलंब होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे राम पूर्णेकर यांनी राजकीय नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 'माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? पोलिसांना हवे असलेले सर्व पुरावे आम्ही दिले आहेत. परंतु राजकीय दबावामुळे पोलीस केवळ चौकशीचे सोंग करत आहेत,' अशी उद्विग्नता त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली. सध्या आपण हतबल झालो असलो तरी, वडील एका लढवय्याप्रमाणे होते आणि त्यांच्याप्रमाणेच न्याय मिळेपर्यंत आपलाही लढा सुरू राहील, असा ठाम निर्धार त्यांनी बोलून दाखवला. राम यांच्या या भूमिकेला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

काल राम पूर्णेकर यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक दावे केले. मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. यावेळी त्यांनी एक सीसीटीव्ही फुटेजही प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. या फुटेजमध्ये पप्या शिंदे याची पांढऱ्या रंगाची कार दिसत असून, तो सर्व परिसर मिनाक्षी शिंदे यांच्या घराच्या आजूबाजूचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सकाळी ८.१० ते ८.४० या वेळेत आरोपी आपल्या घराच्या परिसरात कशासाठी फिरत होते, असा सवालही राम यांनी उपस्थित केला.

पोलिसांकडून आपल्या कुटुंबावर मोठा दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी कासारवडवली पोलीस ठाण्याचे अधिकारी सलग तीन तास आपल्या घरात बसून होते. त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही, असे एका पत्रावर लिहून घेत त्यावर आपली सक्तीने स्वाक्षरी घेण्यात आली. मात्र, संबंधित पत्रावरील हस्ताक्षर आपले नसल्याचा दावा राम यांनी केला आहे. हा विषय इतक्या टोकाला जाईल असे आपल्याला वाटले नव्हते, असेही ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकरणात खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते आपल्या घरी येऊन गेले, मात्र सर्वांकडून फक्त आश्वासनेच मिळाली. कोणत्याही राजकीय पक्षाने याबाबत आक्रमक भूमिका घेतली नसल्याचे राम म्हणाले. आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नसून केवळ वडिलांना न्याय मिळावा यासाठी सर्वांसमोर हात जोडून भीक मागत असल्याचे त्यांनी उद्विग्नपणे सांगितले. पोलिसांना सर्वतोपरी मदत करत असतानाही या नवरा-बायकोला अटक न करता त्यांना सूट का दिली जात आहे, याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या दोघांना आधी आत टाका, अन्यथा भविष्यात एखादा गरीब माणूस निवडणुकीला उभा राहिल्यास त्यालाही हे मारून टाकतील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Lokrajya

Lokrajya is an English digital news platform covering politics, governance, public policy, current affairs, law, business and issues that matter to people across India. The editorial team focuses on clear, factual and context-driven reporting, with an emphasis on accuracy, credible sources and responsible journalism.

🕘 संबंधित बातम्या