प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: हवामान विभागाने दिलेल्या नव्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी राज्याच्या हवामानात महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्यामुळे 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जाणवत असलेल्या 'ऑक्टोबर हिट'नंतर आता दिवसा कडक ऊन आणि मध्यरात्रीपासून हलकी थंडी असे दुहेरी वातावरण निर्माण झाले आहे. यलो अलर्ट देण्यात आलेल्या या चारही जिल्ह्यांतील नागरिकांना उकाड्याचा तीव्र त्रास सहन करावा लागू शकतो.
कोकणातील हवामानाबाबत हवामान खात्याने संमिश्र अंदाज वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, याच हवामान अंदाजामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात मात्र २५ ऑक्टोबरला पावसाची कोणतीही शक्यता नाही. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (घाटमाथ्यासह), जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत हवामान पूर्णपणे कोरडे राहील. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह तिथल्या घाटमाथा परिसरातही पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्येही कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. येथे सर्वत्र कोरडे वातावरण राहील.
एकूणच २५ ऑक्टोबरला राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही भागांतील वाढता उकाडा, दिवसाचे कडक ऊन आणि रात्रीचा गारवा यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ‘पोलिसांचे ८० टक्के काम मीच केले, पण दबावामुळे केवळ सोंग सुरू’, राम पूर्णेकर यांचा गंभीर आरोप
- भीमाशंकरजवळील ३२ हजार वृक्षांच्या कत्तलीवरून रोहित पवारांचा संताप; राज्य सरकारवर केली घणाघाती टीका
- गोकुळ अध्यक्ष निवड: सतेज पाटलांचे विरोधकांना सूचक आवाहन; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचा उल्लेख



